
धानोरा : धानोरा ते मुरूमगाव मार्गावरच्या जपतलाई गावाजवळील वळणावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आश्रमशाळेच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर छत्तीसगडमधील एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील मालिनीताई दहीवडे अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना 26 जानेवारीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी घेऊन जाण्यासाठी स्कॅार्पिओ वाहन जपतलाईमार्गे गोडलवाहीकडे जात होते. त्याचवेळी धानोऱ्याकडून येणाऱ्या छत्तीसगडच्या कारसोबत वळणावर स्कॅार्पिओची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जबर होती की स्कॅार्पिओ उलटी झाली आणि दुसरी कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात गोडलवाही येथील रहिवासी असलेला आश्रमशाळेचा विद्यार्थी रोशन राजू किरंगे (12 वर्ष) याचा मृत्यू झाला. छत्तीसगडच्या कारमधून पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा प्रवास करत होते. त्यापैकी निधी गुप्ता (43 वर्ष) रा.मोहल्ला (छत्तीसगड) ही महिला गंभीर जखमी झाली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
































