गडचिरोली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधिनी गडचिरोली यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित लोकप्रतिनिधी विरुद्ध पत्रकार असा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना शिवाजी महाविद्यालयालगतच्या मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला.
या थरारक सामन्यात लोकप्रतिनिधी संघाने पत्रकार संघावर अवघ्या 3 धावांनी निसटता विजय मिळवला. नाणेफेक जिंकून लोकप्रतिनिधी संघाचे कर्णधार माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाकडून डॉ.नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.प्रणय खुणे, हेमंत राठी, अमोल कुळमेथे, नगरसेवक शेखर आखाडे, हेमंत जंबेवार व अनिल तिडके यांनी संयमी व प्रभावी फलंदाजी करत 12 षटकांत 88 धावा उभारल्या. डॉ.अशोक नेते यांनी संघासाठी 14 धावांचे योगदान दिले.
89 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पत्रकार संघाने चांगली सुरुवात केली; मात्र नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने संघावर दबाव वाढत गेला. रुपराज वाकोडे, डॉ.यशवंत दुर्गे, संदीप कांबळे, निलेश पटले, आशुतोष कोरडे व नितीन ठाकरे यांच्यासह मनोज ताजने, आशिष अग्रवाल, संदीप कांबळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर पत्रकार संघ 85 धावांवर सर्वबाद झाला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांनी मैदान सोडले नाही, हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी अमोल कुळमेथे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात फिरता चषक पत्रकार संघाच्या वतीने लोकप्रतिनिधी संघाला प्रदान करण्यात आला.
सुरुवातीला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पीचवर फित कापून सामन्याला सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, डॉ.प्रणय खुणे, गोविंद सारडा, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, डॉ.भारत खटी, अनिल पोहनकर, हेमंत जंबेवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे, अविनाश भांडेकर आदी अनेक जण उपस्थित होते.
































