सिरोंचा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांचे काम आहे, पण गडचिरोली पोलीस त्यापलीकडे जावुन सामाजिक बांधिलकी जपत ‘पोलीस दादालोरा खिडकीच्या’ माध्यमातून लोकांसाठी विविध योजना राबवित आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे. नागरिकांनी देखील पोलिस दलाला जास्तीत जास्त सहकार्य करून स्वतःचा विकास साधावा, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
रेगुंठा येथे शनिवारी (दि.१२) झालेल्या उपपोलिस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि जनजागरण मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी उपविभाग सिरोंचाअंतर्गत उपपोस्टे रेगुंठा हद्दीतील एकूण १००० पेक्षा जास्त आदिवासी बांधव, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात साडी, धोतर, व्हॉलीबॉल, क्रिकेट बॅट, स्प्रे पंप, नोटबुक, कंपास, बॉलपेन, ब्लॅकेट, ताडपत्री, छत्री, व्हॉलीबॉल नेट, इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सर्वांनी शिक्षण घेतले पाहीजे, शैक्षणिकदृष्टया आपण प्रगत झाले पाहीजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यांचे विचार जोपासुन आपण आपली उन्नती करुन घेतली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, रेगुंठा येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी कम्युनिटी पोलिसिंगचे काम चांगले केले आहे. येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात १२० महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात बि-बियाणे, ६० आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह व शासकीय कागदपत्रे मिळवून देणे अशा प्रकारची बरीच चांगली कामे केली असल्याचे सांगितले.