गडचिरोली : तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शुक्रवारपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसाची रिपरिप शनिवारीही दिवसभर सुरू होती. यामुळे जिल्ह्यातील सहा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. रविवारी येलो अलर्ट असल्यामुळे पावासाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे गोसेखुर्द धरणाच्या सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शनिवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात जिल्ह्यात सरासरी ४९.४ मिमी पाऊस पडला. त्यात धानोरा आणि मुलचेरा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे अनेक छोट्या नद्या-नाल्यांना पूर आला. काही मार्ग पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
हे मार्ग झाले आहेत बंद
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७ वाजता जिल्ह्यातील सहा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचे कळविले. त्यात तळोधी-आमगांव-एटापल्ली हा राज्यमार्ग पोहार नदीच्या पुरामुळे बंद आहे. मुधोरी-लक्ष्मणपूर-येनापूर-वायगांव-कन्हाळगांव-रविंद्रपूर-राममोहनपूर-सुभाषग्राम हा मार्ग स्थानिक नाल्यामुळे बंद झाला आहे. चातगांव-कारवाफा-पोटेगांव-पावीमुरांडा-घोट हा राज्यमार्ग पोहार नदीवरील पुरामुळे पोटेगावजवळ बंद झाला आहे. चातगाव-कारवाफा-पोटेगांव-पावीमुरांडा-घोट हा राज्यमार्ग काटेझरीजवळ स्थानिक नाल्यामुळे बंद आहे. चातगांव-कारवाफा-पेंढरी हा राज्यमार्ग कारवाफा नाल्याच्या पुरामुळे बंद आहे. तसेच मानापूर-मंगडा-अंगारा-कोसरी-मालेवाडा रस्ता मानापूर जवळच्या स्थानिक नाल्यामुळे बंद झाला आहे.