विरोधाच्या सावटात झाले पं.दीनदयाल उपाध्याय अध्यासनाचे उद्घाटन

विद्यापिठाच्या गेटसमोर विरोधात निदर्शने

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात ‘पं.दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ अध्यासन सुरू करण्यास आदिवासीबहुल संघटना व काही राजकीय पक्षांनी विरोध केला. मात्र त्या विरोधाच्या सावटात आणि कडक पोलीस बंदोबस्तात शनिवारी या अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे विद्यापीठाच्या गेटसमोर हाती फलक घेऊन निदर्शने सुरू होती, तर दुसरीकडे विद्यापीठातील सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार भारतीचे माजी पदाधिकारी आणि विचारवंत आषुतोष अडोणी, कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे आणि विद्यापीठाचे इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववादातून समाजाची आर्थिक रचना कशी असावी याचे मार्गदर्शन केले. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात या अध्यासनातून विद्यार्थ्यांना समाजकारण, अर्थकारण आणि राष्ट्रकारणाचे धडे गिरवता येतील, असे अडोणी म्हणाले.

दुसरीकडे आदिवासी विकास युवा परिषद आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठावर मोर्चा काढला. तो विद्यापीठाच्या गेटवर अडविण्यात आला. त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. विद्यापीठाचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनावर आगपाखड केली. दरम्यान हे अध्यासन सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिसभेने, व्यवस्थापन परिषदेने कायदेशिर प्रक्रियेतून घेतला आहे. त्यामुळे त्याला अशा पद्धतीने विरोध करणे योग्य नसल्याचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना सांगितले.