गडचिरोली : जादुटोणाविरोधी कायद्याला 10 वर्ष पूर्ण होत असल्याने अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, तसेच जादुटोणाविरोधी कायद्याविषयी सर्वत्र जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत गुरूवारी पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यशाळेत काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखविण्यात आले. त्यात पिण्याच्या पाण्याने दिवा पेटवून लोकांना अंधश्रद्धेला कसे बळी पाडले जाते हेसुद्धा दाखविले.
नागरिकांच्या मनात असलेली जादूटोणाविषयीची अंधश्रद्धा दूर करता यावी याकरीता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पुढाकाराने सदर प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉलमध्ये केले होते.
या कार्यशाळेत पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन आणि पोलिस मदत केंद्रातील अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या हद्दीतील पोलिस पाटील उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पाण्यावर दिवा पेटवून करण्यात आले. यावेळी जादुटोणा विरोधी कायद्याबाबत माहिती देऊन जादुटोण्याचे चमत्कार कसे होतात, त्याबाबत काय उपाययोजना करता येतील यावर माहिती समजाऊन सांगितली.
यावेळी पोलिस अधीक्षकांनी आपल्या मार्गदर्शनात पाण्यावर दिवा पेटणे हा चमत्कार नसून पाणी आणि कॅल्शियम कार्बाईटचा खडा एकत्र केल्याने त्यावर रासायनिक अभिक्रिया घडून गॅसची निर्मिती होत असते व त्या गॅसमुळे हा दिवा पेटत असतो, असे स्पष्ट केले. अंधश्रद्धा पाळणे, जादुटोणा करणे हा कायद्याने गुन्हा असून येथील नागरिकांनी अंधश्रद्धेला आणि जादुटोण्याला प्राधान्य न देता आपला विकास आपणच साधावा असे आवाहन केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, राज्य बुवाबाजी संघर्ष कार्यवाहक भगवान रनदिवे, गडचिरोली येथील स्थानिक शाखेचे डॉ.चंद्रशेखर डोंगरवार, तसेच प्रा.मुनिश्वर बोरकर, कांतीलाल साखरे, सरोज साखरे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा आतला उपस्थित होते.