गडचिरोली : हरितालिकेच्या पुजेनंतर बुधवारी गौरी विसर्जन आणि पुजेसाठी जिल्हाभरातील महिलांनी ठिकठिकाणच्या जलाशय आणि नद्यांवर गर्दी केली होती. गडचिरोली शहरातील महिलांनी कठाणी नदीच्या तिरावर, तसेच गोकुळनगरच्या तलावावर गौरी विसर्जन आणि पूजन केले.
यावेळी नदी किंवा तलावातील पाण्याचे प्रदुषण वाढू नये यासाठी नगर परिषदेकडून गौरीसाठी विसर्जन कुंडाची, तसेच निर्माल्य विसर्जनाची सोय केली होती. मात्र बहुतांश महिला नदीच्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी इच्छुक दिसत होत्या. दोन दिवसांच्या पुरानंतर बुधवारी पाणी ओसरल्याने अनेक महिला पाण्याच्या पात्रात उतरून पूजन करत होत्या.
एकमेकींना हळद-कुंकू लावत आणि डोक्यावरील केसात गौरीची जव खोवण्याचा पारंपरिक रिवाज महिला पाळताना दिसल्या.