गडचिरोली : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण आणि व्हिजन रेस्क्यू संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानव तस्करी विरोधात जनजागृतीसाठी ‘वॉक फॉर फ्रिडम’ या मूक पदयात्रेचे आयोजन गडचिरोलीत केले होते. यात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी, तसेच विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
पदयात्रेला सुरूवात करण्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि मानवी तस्करी कशा स्वरूपात समाजात घडत आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रकारच्या व विविध हेतूच्या मानव तस्करीच्या घटना सांगत या सामाजिक ज्वलंत प्रश्नांविषयाची जाणीव ठेऊन कठोर पाऊले उचलण्याची गरज समजाऊन सांगितली. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मानव तस्करीविरोधात योगदान देण्यासाठी शपथ दिली. त्यानंतर पदयात्रेला त्यांनी झेंडी दाखविल्यानंतर ही पदयात्रा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाली.
याप्रसंगी व्हिजन रेस्क्यू संस्था मुंबई यांच्या वतीने तुलना देवगडे, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रमोद जावरे व शहरातील विविध महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
ही रॅली गडचिरोली शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांसोबत एकरूप होऊन जिल्हा न्यायालय परिसर येथून आयटीआय चौक व नंतर एलआयसी चौक मार्गे परतीच्या दिशेने पोलिस संकुलाजवळून जिल्हा न्यायालय परिसरात येऊन थांबली. न्यायालय परिसरात रॅलीची सांगता झाली.