गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या ‘इंद्रधनुष्य २०२३’ या तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॅाडेल अलिशा मेलानी हिच्या हस्ते आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात करण्यात आले. यात विद्यापीठाअंतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी गोंडवाना विद्यापीठाची विद्यार्थिनी ते आता अभिनेत्री आणि मॅाडेल म्हणून करिअर करेपर्यंतचा प्रवास अलिशाने विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यासोबत आपल्या आयुष्याची दिशा ठरवताना काय केले पाहिजे, याबद्दलही मोलाचा सल्ला दिला.
विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून अलिशा मेलानी हिच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, तर विशेष उपस्थिती म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, रासेयोचे संचालक डॉ.श्याम खंडारे, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य डॉ.इमॅन्युअल कोंड्रा, विद्यार्थी विकास विभागाच्या प्रभारी संचालक डॉ.प्रिया गेडाम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अलिशाने मी ज्या विद्यापीठातून शिक्षण घेतले त्याच विद्यापीठाच्या कार्यक्रमात अतिथी म्हणून हजर राहताना खूप आनंद होत असल्याचे सांगितले. विद्यापीठाने मला अनेक स्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत जाण्याची संधी दिली. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात यश मिळवायचे असल्यास स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, असाही सल्ला तिने दिला. यावेळी अलिशाने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे देत त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, डॅा.अनिल चिताडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.प्रिया गेडाम यांनी तर संचालन जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच विविध स्पर्धांना सुरूवात झाली. दि.१९ ला या महोत्सवाचा समारोप होणार आहे.