गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर भागात पाच कंपन्यांना लोहखनिज काढण्यासाठी देण्यात आलेल्या झेंडेपारमधील जागेची लिज ४७ हेक्टर दाखविण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात या खाणींसाठी १ हजार १७ हेक्टर जमीन दिली जाणार आहे, असा दावा नक्षल प्रवक्ता श्रीनिवास याने एका पत्रकातून केला आहे. त्यामुळे या लोहखाणींच्या लिजवरून पुन्हा नवे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या लोहखाणींचा सामूहिकपणे विरोध करण्याचे आवाहन या नक्षल पत्रकातून करण्यात आले आहे.
नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याच्या नावाने काढण्यात आलेल्या या पत्रकात वास्तविकतेला लपवून खनिज काढण्याचे काम केले जाईल. यात कॅार्पोरेट शक्ती हजारो लोकांचे अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानाने जगण्याच्या अधिकाराला ठेच पोहोचविल्याचे म्हटले आहे. स्थानिक नागरिकांनी एकजुटीने याचा विरोध करण्याचे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.
दरम्यान यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता लोहखाणीचे क्षेत्र वाढविण्यासाठी नव्याने खाणींची लिलाव प्रक्रिया सरकारकडून केली जाते. जुन्याच कंपन्यांना परस्पर लोहखाणीचे क्षेत्र वाढवून मिळत नाही, असे स्पष्ट केले.