गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या विकासासह माओवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने सोमवार, दि.20 रोजी हेडरी उपविभागांतर्गत येणाऱ्या वांगेतुरी या ठिकाणी नवीन पोलिस स्टेशनची स्थापना केली.
पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि इतर पोलिस अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला.
सदर पोलिस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तब्बल एक हजार सी – 60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम आणि 500 विशेष पोलीस अधिकारी तथा नवनियुक्त पोलिस जवान यांनी खासगी कंत्राटदाराच्या मदतीने अवघ्या 24 तासात या नवीन पोलिस स्टेशनची उभारणी केल्याची माहिती पोलिस विभागाने दिली.
एकूण 1500 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 10 ट्रेलर, 4 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहायाने या पोलिस स्टेशनची उभारणी करण्यात आली. या पोलिस स्टेशनमध्ये वायफाय सुविधा, 20 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी गडचिरोली पोलिस दलाचे 4 अधिकारी व 63 अंमलदार, एसआरपीएफचे 1 अधिकारी व 42 अंमलदार, तसेच सीआरपीएफच्या 191 बटालियनचे 1 असिस्टंट कमांडन्ट व 1 जी कंपनी, तसेच एका अधिकाऱ्यासह 1 यंग प्लाटुन तैनात करण्यात आली आहे.
वांगेतुरी पोलिस स्टेशन स्थापन झाल्याने त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वांगेतुरी, हेडरी, गट्टा जांबिया व संपूर्ण एटापल्ली तालुक्यात पुढील १५ दिवसांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (जमावबंदी) लागू केली आहे.
स्थानिक नागरिकांना विविध साहित्याचे वाटप
पोलिस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना सलवार सुट, नऊवारी साडी, पुरुषांना धोतर, लोअर पॅन्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, टी-शर्ट, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकलेट्स, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सीआरपीएफचे कमान्डंट सत्यप्रकाश, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) बापुराव दडस, तसेच वांगेतुरीचे ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि महेश विधाते उपस्थित होते.