गडचिरोली : पाचव्या अनुसूची क्षेत्रातील विशेष तरतुदी आणि कायदे, नियम धाब्यावर बसवून सुरू केल्या जात असलेल्या लोहखाणींना विरोध करण्यासह आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध विषयांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबर रोजी उलगुलान महामोर्चा काढला जाणार आहे. प्रागतिक पक्षांच्या वतीने गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या या मोर्चात आदिवासी, गैरआदिवासींनी सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
आदिवासी समाजाच्या खांद्याला खांदा लावून दलित, ओबीसी, भटके विमुक्त आणि जिल्ह्यातील ग्रामसभा या मोर्चात सहभागी होणार असून या महामोर्चाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे पाॅलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे, भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ.भालचंद्र कांगो, राज्य सचिव ॲड.सुभाष लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश माने, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरिष उईके हे करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला शेकापचे रामदास जराते, माकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश कोपूलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईलियास पठाण, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, विनोद मडावी, भाकपचे जिल्हा सचिव देवराव चवळे, शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, तितिक्षा डोईजड, अक्षय कोसनकर, हंसराज उंदिरवाडे, अशोक खोब्रागडे, हेमंत डोर्लीकर, भाकपचे संजय वाकडे, प्रकाश खोब्रागडे, प्रतीक डांगे, विजय देवतळे, कैलास रामटेके, सतीश दुर्गमवार प्रामुख्याने उपस्थित होते.