गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षीच्या उन्हाळ्यात तीन वाघांची शिकार झाल्यानंतर आणखी एका वाघाची शिकार उघडकीस आली आहे. एटापल्ली तालुक्यात वाघाच्या कातडीसह दोघांना अटक करण्यात आली. छत्तीसगड वनविभागाने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एटापल्ली ते जीवनगट्टा मार्गावर दुचाकीवरून वाघाची कातडी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करून वाघाची कातडी जप्त करण्यात आली. श्यामराव रमेश नरोटे (३० वर्ष) रा.वासामुंडी आणि अमजदखाँ अमीरखाँ पठाण (३७) रा.एटापल्ली अशी त्या आरोपींची नावे आहेत.
दरम्यान दोन्ही आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची वनकोठडी मिळाली. विशेष म्हणजे या आरोपींनी गडचिरोली जिल्ह्यातच वाघाची शिकार केल्याची कबुली देऊन शिकार कुठे केली याचे ठिकाणही सांगितल्याचे समजते.
महाराष्ट्र आणि छत्तीसगड वनविभागाच्या संयुक्त चमुने ही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारात वाघाच्या कातडीला लाखोंची किंमत मिळते. त्यामुळे ही कातडी नेमकी कोणत्या वाघाची आहे, कातडीच्या तस्करीचे तार कुठे-कुठे जुळले आहेत, हे शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर निर्माण झाले आहे.