आलापल्ली : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हे नवे अभियान हाती घेतले असून अहेरी तालुक्यातील अल्लापल्ली येथील क्रीडा संकुल परिसरात ५ डिसेंबर रोजी पहिला मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, अहेरीचे तहसीलदार सुनील सौंदाणे, प्रभारी गटविकास अधिकारी राहुल वरठे, नायब तहसीलदार हमीद सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, सदस्य सोमेश्वर रामटेके, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती विभागामार्फत विविध शाखांचे स्टॉल लावण्यात आले. वन विभाग तसेच तालुका कृषी तसेच विविध विभागांचे स्टॉल लागले होते. मान्यवरांच्या हस्ते महिलांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आलापल्लीलगतच्या परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर यांनी केले.