गडचिरोली : केंद्रीय राखिव पोलिस दलाच्या 192 बटालियनच्या वतीने आदिवासीबहुल, दुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल कसनसूर येथे गावकरी, विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले. गरजवंत नागरिकांनी याचा लाभ घेतला. विशेषत: शाळकरी मुलांना विविध खेळांचे साहित्य वाटण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद पसरला.
सीआरपीएफने नागरी कृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन बटालिनचे कमांडंट परविंदरसिंह यांच्या मार्गदर्शनात केले होते. आत कसनसूर उपपोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भूमकम, चोकेवाडा, घोटसूर, कोठारी, वेनासर व इतर गावातील नागरिकांनी भाग घेतला.
या कार्यक्रमात उपकमांडंट शिव महेंद्र यादव आणि सहायक कमांडंट सुनील कुमार यांच्या हस्ते व्हॅालिबॅाल, नेट, क्रिकेट किट, कॅरम बोर्ड अशा खेळाच्या साहित्यासह फळदार झाडांच्या रोपांचे वाटप केले. यावेळी निरीक्षक राकेश कुमार,पीएसआय डी.एल.बसावे तसेच सरपंच कमला हेडो प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून गावकऱ्यांना औषधींचे वाटप करण्यात आले.