गडचिरोली : भोई , ढिवर आणि तत्सम समाजाच्या अनेक समस्या असल्यामुळे हा समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकदृष्टया अप्रगत आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी आपण व्यक्तिशः प्रयत्न करावे, अशी मागणी करणारे निवेदन गडचिरोली जिल्हा भोई, ढिवर आणि तत्सम जाती समाज संघटनेच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांना देण्यात आले.
जातीय जनगणना करुन आमच्या समाजाला हक्काचे आरक्षण, विमुक्त व भटक्या जमातीचे अ, ब, क, ड गट रद्द करून सर्वांना समान न्याय, समाज अशिक्षित असून शैक्षणिक प्रगती व्हावी व समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मुलांना विशेष शैक्षणिक योजना लागू करावी. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील जाचक अटी कमी करून समाजाला घरकुल देण्यात यावे, पारंपरीक व्यवसाय असलेल्या मच्छीमार बांधवांना तलाव व मच्छीमार सोसायटीवर हक्क व अधिकार देण्यात यावेत, मच्छीमारी व्यवसाय करण्याऱ्या बांधवांना शासनाकडून १० टक्के व्याजदराने आर्थिक मदत देण्यात यावी व जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्यात याव्या, या मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा भोई ढिवर व तत्सम जाती समाज संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले.
यावेळी आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांचा भोई, ढिवर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा भोई ढिवर समाज संघटनेचे संयोजक कृष्णा मंचलवार, सल्लागार रामदास जराते, जिल्हाध्यक्ष भाग्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष सुनील बावणे, जिल्हा सचिव किशोर बावणे, कोषाध्यक्ष दुधराम सहारे, प्रभाकर बावणे, जयश्री जराते, किशोर गेडाम, पंकज राऊत, पितांबर मानकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.