गडचिरोली : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका 1995 पासून संदिग्ध आहे. म्हणूनच त्यांच्यावर भाजपची बी-टिम असल्याचा आरोप होतो. 2019 ला अधिक पोषक वातावरण असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वात आंबेडकरी चळवळींचे एकत्रिकरण करण्यासाठी ईच्छुक होतो, पण आंबेडकरांनी तसे होऊ दिले नाही. त्यांची भूमिका यावेळीही संदिग्धच आहे, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.सुरेश माने यांनी केला.
गडचिरोलीत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते म्हणाले, देशात शासन कसे असावे आणि कसे नसावे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. भाजपची धोरणं मूठभर लोकांच्या हिताची आहेत हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव आम्ही दिला होता. पण आघाडीतील प्रमुख पक्षांमध्येच जागा वाटपावरून मारामार असल्याने त्यांच्याकडे इतर पक्षांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. काँग्रेसमधील अंतर्गत चढाओढच काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार ठरेल. त्यामुळे आमचे उमेदवार पर्याय म्हणून समोर येतील, असा विश्वास अॅड.माने यांनी व्यक्त केला.
राज्यात ईडी-सीबीआयच्या धाकामुळे काँग्रेस भाजपसोबत ठामपणे लढायला तयार नाही. 2019 ची समीकरणे यावेळी नाहीत. त्यामुळे वंचितचा फॅक्टर यावेळी राहणार नाही, असेही ते म्हणाले. बीआरएसपी गडचिरोली जिल्ह्यात 15 मुद्द्यांचा जाहीरनामा प्रकाशित करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पक्षाचे उमेदवार बारीकराव मडावी, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड उपस्थित होते.