गडचिरोली : भाजपला 2014 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा 2019 मध्ये विसर पडला. आता 2019 मधील आश्वासने जाऊन नवीन मुद्दे समोर केले जात आहेत. हाताला दिले नाही काम, म्हणून म्हणतात केवळ राम-राम, अशी टिका करत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते सोमवारी (दि.1) गडचिरोलीत बोलत होते.
यावेळी मंचावर उमेदवार डॅा.नामदेव किरसान, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी जि.प.अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, अजय कंकडालवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, श्याम धाईत, रोहिदास राऊत, राजू कात्रटवार, विजय गोरडवार, अमोल मारकवार, हनुमंत मडावी, हसनअली गिलानी, वामनराव सावसाकडे, अतुल मल्लेलवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना.वडेट्टीवार म्हणाले, आम्ही जनामनातील उमेदवार दिला आहे. त्यामुळे डॅा.किरसान यांचा विजय निश्चित आहे. गडचिरोलीची जागा आदिवासी राखीव आहे. या जिल्ह्यात आदिवासींवर अन्याय होत असेल तर वंचितसारख्या पक्षाने चळवळीतील उमेदवाराला साथ दिली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने, गांधी-नेहरू घराण्याने ७० वर्षात काही केले नाही असे म्हणणाऱ्यांना गांधी घराण्याचे योगदान काय, हे माहित नाही. आयत्या बिळात नागोबा बनणारे, त्या काळात इंग्रजांचे पाय चाटणारे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात, अशी खोचक टिकाही त्यांनी केली.
काँग्रेस पक्षावर आयकर विभागाकडून ज्या पद्धतीने हेतुपुरस्सर कोट्यवधी रुपयांचा दंड आकारून निवडणुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यावरून हे सरकार ‘इंडिया’ आणि काँग्रेसला घाबरले आहे. हा लोकशाहीवर घाला आहे. देशात अघोषित हुकुमशाहीच लादली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॅा.किरसान म्हणाले, मी तिकीटासाठी दिल्ली-मुंबईच्या वाऱ्या केल्या नाही. ना.विजय वडेट्टीवार यांच्याशिवाय कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला भेटलो नाही. फक्त जनसंपर्क वाढवून पक्षाचे काम करत राहिलो. जिल्ह्यातील प्रश्नांना संसदेत वाचा फोडण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावर उपस्थित इतरही नेतेमंडळीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले.