आरमोरी : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांच्यासाठी शुक्रवारी आरमोरीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मॅरेथॅान प्रचारसभा घेतली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिग्गज नेते या सभेच्या निमित्ताने एकाच मंचावर आले होते. वेळेअभावी बाकी नेत्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले, मात्र विजय वडेट्टीवार यांनी पुढील कार्यक्रमात बदल करून आरमोरीची सभा गाजविली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सभा आटोपून हेलिकॅाप्टरने ही सर्व मंडळी आरमोरीतील सभेसाठी आली होती. यावेळी नियोजित वेळेपेक्षा जास्त उशिर झाल्याने प्रदेश प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छोटेखानी भाषण करत पुढील सभेची वाट धरली. मात्र ना.विजय वडेट्टीवार यांनी पुढील दौऱ्यात बदल करत आरमोरीत थांबणे पसंत केले. त्यांनी सविस्तर भाषण करताना केंद्र सरकारची धोरणं, महागाई, राज्यातील युती सरकारची जुमलेगिरी आदी मुद्द्यांवर टिकास्र सोडले.
प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. यावेळी मंचावर खासदार चंद्रकांत हांडोरे, आ.अभिजित वंजारी, उमेदवार डॅा.नामदेव किरसान, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार रामकृष्ण मडावी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र चंदेल, रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, कॅाम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, महेश कोपुलवार, अविनाश वारजुरकर आदी उपस्थित होते.