गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त सामान्य निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंह, निवडणूक खर्च निरीक्षक एस. वेणूगोपाल, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्वाधिक अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. त्यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील जिल्हा परिषद शाळेत निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. तसेच अहेरी व नागेपल्ली येथील मतदान केंद्रांची पाहणी करून मतदान केंद्राध्यक्ष तथा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सत्रात मार्गदर्शन केले.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी गडचिरोली-चिमूर क्षेत्रात मतदान होणार असल्याने प्रशासनाची जोमाने तयारी सुरू आहे. या लोकसभा क्षेत्रात एकूण ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. तेलंगाणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांची सीमा लागून असलेल्या तसेच सर्वाधिक संवेदनशील अशा अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागेपली येथे दाखल झाले.
यावेळी त्यांनी येथील स्ट्रॉँग रुम, ईव्हीएम साठवणूक कक्ष तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी केली. अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावसाठी शेड व इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनीसुद्धा मतदान पथकांच्या दुसऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख तसेच अहेरी उपविभागातील सर्व तहसीलदार उपस्थित होते.
लोकसभा क्षेत्रात 24 हजार नवीन मतदार
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील 24 हजार 26 नवमतदारांनी नोंदणी केली आहे. यात 13 हजार 261 पुरुष तर 10 हजार 764 महिलांचा समावेश आहे. त्यात आमगाव विधानसभेत 1715 पुरुष आणि 1365 महिला, असे एकूण 3080 मतदार, आरमोरी विधानसभेत 1848 पुरुष आणि 1544 महिला एकूण 3392 मतदार, गडचिरोली विधानसभेत 2784 पुरुष आणि 2287 महिला मिळून 5071 मतदार, अहेरी विधानसभा क्षेत्रात 2102 पुरुष आणि 1509 महिला व एक तृतियपंथी असे एकूण 3612 मतदार, ब्रम्हपुरी क्षेत्रात 2458 पुरुष आणि 2023 महिला असे एकूण 4481 मतदार, तर चिमुर क्षेत्रात 2354 पुरुष आणि 2036 महिला मतदार मिळून 4390 मतदारांनी नोंदणी केली आहे.