गडचिरोली : जे लोक गडचिरोलीत रोजगार निर्माण करतील त्यांनाच येथे उद्योग उभारणीसाठी परवानगी दिली जात आहे. या जिल्ह्यात पुढील १० वर्षात ५० हजार युवकांना रोजगार देण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आलापल्ली येथे महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महायुतीचे उमेदवार तथा खा.अशोक नेते, माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जि.प.च्या माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेच्या संपर्क प्रमुख वर्षा मोरे, जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, भाजपचे बाबुराव कोहळे, माजी जि.प.अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, हर्षवर्धनबाबा आत्राम, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, सरपंच शंकर मेश्राम, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.फडणवीस म्हणाले, सलग १० वर्ष सत्तेत असूनही भाजप सरकारविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी नाही. मात्र काँग्रेसवाले लबाड आहेत. त्यांनी भारताचे संविधान ७० वर्षपर्यंत संपूर्ण भारतात लागूच होऊ दिले नाही. जम्मू-काश्मिरात मोदींनी ते लागू केले. गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले, उद्योगासाठी जबरदस्तीने जमिनी घेणार नाही. कोनसरी परिसरातील नदीकिनारी असणाऱ्या दहा-पंधरा गावातील शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या संमतीशिवाय अधिग्रहित केल्या जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली. आम्ही प्रकल्पग्रस्तांना चार पट जास्त मोबदला दिला आहे. तोच नियम गडचिरोलीसाठीही लागू राहिल. पण हे करताना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. या जिल्ह्यातील मागास घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर कदाचित पालकमंत्रीपद सोडावे लागले तर नागपूरचे पालकमंत्रीपद सोडेन, पण गडचिरोलीचे नाही, असे सांगत फडणवीस यांनी गडचिरोलीवरचे प्रेम व्यक्त केले.
ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, पाच विधानसभा क्षेत्रात मी खा.अशोक नेते यांच्यासोबत 18 प्रचारसभा घेतल्या. यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये डॅा.नामदेव उसेंडी यांना अहेरी मतदार संघातून मताधिक्य दिले आहे. यावेळी दोन्ही राजे (अम्ब्रिशराव आणि धर्मरावबाबा) एकत्र आल्यानंतर मोठे मताधिक्य मिळणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव म्हणाले, गेल्या 70 वर्षात काँग्रेसने या क्षेत्रात काय केले? गेल्या 10 वर्षात भाजपच्या नेतृ्वातील केंद्र आणि राज्य सरकारने रस्ते, पूल, रुग्णालय, स्कूल, दुर्गम भागात वीज पुरवठा दिला. नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व देशाला लाभल्यामुळे सर्वांच्या तोंडी मोदींचे नाव आहे. पुन्हा त्यांच्या हाती नेतृत्व सोपविण्यासाठी खा.अशोक नेते यांच्या हाती लोकसभा क्षेत्राची धुरा सोपविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार तथा खा.अशोक नेते म्हणाले, मी केवळ मोदीजींचीच कामे सांगतो, लोकसभा क्षेत्रात केलेली कामे सांगत नाही, असा आरोप विरोधक करतात. पण मी 10 वर्षात कोणकोणती कामे केली हे सांगण्यासाठी वेळ कमी पडेल. टिका करणाऱ्यांनी या क्षेत्रासाठी किती योगदान दिले हे सांगावे. मी या विषयावर समोरासमोर वादविवाद करण्यास तयार आहे, असे आव्हानच त्यांनी दिले.
कुरखेडा, कोरची तालुक्यातील वीजेची समस्या निकाली काढण्यासाठी देवरी तालुक्यातील चिचगड येथे नवीन फिडर मंजूर झाले आहे. ते काम पूर्ण होईपर्यंत चिचगडवरून नवीन लाईन देऊन उपाययोजना करण्याची मागणी खा.नेते यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र ओल्लालवार यांनी केले.