गडचिरोली : लोकसभा निवडणूक संपताच गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने युवा जोड अभियान सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात केंद्र सरकार व राज्य सरकारची जनकल्याणकारी कामे पोहोचवण्यासाठी आणि गावागावातील युवक-युवती तथा नागरिकांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी युवा जोड अभियान राबविले जात आहे. भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे, तसेच चामोर्शी शहर महामंत्री तथा बंगाली आघाडीचे संयोजक रमेश अधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
दररोज विविध गावात वेगवेगळे युवक मंडळ, युवा कार्यकर्ते व सुशिक्षित बेरोजगार यांच्यासोबत थेट संपर्क करून त्यांच्यासोबत संवाद साधत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न येणार आहे. या समस्या सोडविण्यासाठी खासदार अशोक नेते यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात दर गुरुवारी युवकांची तालुकानिहाय बैठका घेतल्या जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ, कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण बेरोजगार युवकांना देण्यात येणार आहे. तसेच रोजगार, स्वयंरोजगाराबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यात येईल, असे आशिष पिपरे व रमेश अधिकारी यांनी कळविले.