देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी (दि.26) संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 164 पुरुष आणि 24 महिलांसह एकूण 188 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत या मानवीय कार्यात आपले योगदान दिले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते, आणि संत निरंकारी मंडळाचे नागपूर झोनचे इंचार्ज किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संयोजक आसाराम निराकटरी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक हरिष निरंकारी, साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेश विठलानी, गडचिरोली शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ.अशोक तुमरेडी, सतीश ताडकलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
रक्तदानासारखे ईश्वरीय कार्य ही संत निरंकारी मंडळाची ओळख झाली आहे, अशी भावना यावेली आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली. गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात रक्तटंचाई निर्माण झाल्यामुळे संत निरंकारी मंडळाला रक्तदान शिबिर घेण्याची विनंती रक्तपेढीतर्फे करण्यात आली होती. मंडळाने मानव सेवेसाठी तातडीने या शिबिराचे आयोजन केल्याचे किशन नागदेवे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले. तसेच शिबिरासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
संत निरंकारी मंडळाद्वारे 24 एप्रिलला सद्गुरू बाबा गुरबचनसिंहजी महाराज तथा अन्य हुताम्यांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘मानव एकता दिवस’ साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी सर्व जिल्हा केंद्र किंवा इतर मुख्य ठिकाणी रक्तदानातून त्यांना श्रद्धांजली दिली जाते. त्यानंतर सर्व विश्वभरात आवश्यकता व सोईनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या चमुने सहकार्य केले. यात स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या रक्त तपासणी चमुनेही योगदान दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादलाचे सर्व स्त्री-पुरुष सदस्य गणवेशात उपस्थित राहून धावपळ करीत होते.
कार्यक्रमाचे संचालन सेवादलाचे संचालक नानकराम कुकरेजा यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले.