गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी आणि रणनिती आखणे सुरू केले आहे. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णयही जवळजवळ पक्का केला आहे. परंतू गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची आतापर्यंत काँग्रेसच्या कोट्यात असलेली जागा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याच्या भितीने काँग्रेसच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. यातूनच गडचिरोलीतील गटातटात विखुरलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन ही जागा कोणासाठी सोडणार नाही, आम्हीच लढवू अशी भूमिका पक्षश्रेष्ठींपुढे मांडली. त्याला तूर्त काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी होकार देत कामाला लागण्याची सूचना केली. परंतू त्यांचा हा होकार म्हणजे अंतिम निर्णय नसल्यामुळे या जागेबाबतची अनिश्चितता अजूनही कायम असल्याचे म्हटले जात आहे.
2 जून 2023 रोजी मुंबईच्या टिळक भवनातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेसच्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक 2024 बाबत आढावा बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळ पक्षनेता बाळासाहेब थोरात, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा व सोनम पटेल, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, बसवराज पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीबाबत वरिष्ठांना माहिती दिली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात वर्तमान परिस्थितीतही स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या पाहता काँग्रेस पक्ष वरचढ ठरत असल्याचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेसच्या कोट्यातच राहील असे आश्वस्त केले. आगामी निवडणुका लक्षात घेत जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावरील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही भुलथापांना बळी न पडता अधिक जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या. यामुळे काही प्रमाणात का होईना, लोकसभा निवडणुकीसाठी दोन वर्षांपासून तयारीला लागलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
लोकसभा क्षेत्रातील या पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी
या बैठकीला काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी आमदार अविनाश वारजूरकर, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आमदार सहसराम कोरोटे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, विश्वजीत कोवासे, जेसा मोटवानी, सतीश वारजूकर, मुस्ताक हकीम, मनोहर पाटील पोरेटी, वामनराव सावसाकडे, लॉरेन्स गेडाम, छगन शेडमाके, सुनील चटगुलवार, अनिल कोठारे, नितेश राठोड, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना काळे, प्रदेश सचिव पी.जी. कटरे, प्रदेश सचिव अमर वराडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.