गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे अविकसित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या, तसेच भाजप महिला आघाडीच्या कामात विशेष योगदान देणाऱ्या रेखाताई डोळस यांना आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रेखाताईंनी आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यातील महिला, युवकांच्या विविध प्रश्नांवर काम केले. नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांनाही लावून धरून ते सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे अलिकडेच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत त्यांच्यावर ज्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली होती तेथील भाजपचे उमेदवार अभय पाटील भरघोस मतांनी विजयी झाले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याला आणखी चालना देण्यासाठी भाजपने त्यांना महिला प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी दिली.
या जबाबदारीसाठी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवते यांच्यासह सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत आगामी काळात त्यांना अपेक्षित असलेला महिला मोर्चा घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

































