सिरोंचा : सिरोंचा नगरीसह तालु्क्यात सध्या महावितरणची वीज अतिशय बेभरवशाची झाली आहे. कधी आणि किती वेळासाठी वीज पुरवठा खंडीत केला जाईल याचा काहीच नेम नसतो. याबाबत तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंचा येथील महावितरणचे कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.
भाग्यश्री आत्राम यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सिरोंचा तालुकावासियांचा वारंवार वीज खंडीत होण्याच्या कारणांचा जाब त्यांनी विचारला. वीज पुरवठ्याच्या समस्येकडे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी जाब विचारला.
देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. याशिवाय शेतकऱ्यांना वापरानुसार वीज बिल न देता सरसकट बिल देऊन लुटमार केली जात असल्याकडेही त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. हा प्रकार खपवून घेणार नसल्याचे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मधुकारजी कोलुरी, युवाध्यक्ष एम.डी. शानू, नगरसेवक सतीश भोगे, माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, गणेश बोधनवार, चेतन राव, मदनया महदेशी, रवि सुल्तान, देवा यनगणदुला व राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचाचे पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.