गडचिरोली : लांबपर्यंत विस्तारलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन होऊन अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या चर्चा अधूनमधून उठत असतात. हे विभाजन केव्हाही होवो, पण आम्हाला मात्र स्वतंत्र तालुक्याचा दर्जा आधी द्या, अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील असरअली आणि झिंगानूर या दुर्लक्षिक क्षेत्रातून केली जात आहे. असरअली येथील सामाजिक व भाजपचे कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी यासंदर्भातील निवेदन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेकडे पाठविले.
सुगरवार यांनी निवेदनात नमुद केल्यानुसार, असरअली हे गांव सिरोंचा तालुक्यातील सर्वात मोठे आणि लोकसंख्या जास्त असलेले गाव आहे. असरअली क्षेत्राच्या हद्दीत ३ ते ३० कि .मी. अंतरावर ३५ ते ४० गावे येतात. या क्षेत्रात गेल्या दोन वर्षात सगळीकडे रस्ते व पुलांचे बांधकाम झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यांमेची कामे सुरू आहे. या क्षेत्रातील प्रत्येक गावांना असरअली येथे येण्याजाण्यासाठी सुरळीत मार्गांने जोडले आहे.
मेडीगड्डा प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या या भागात गोदावरी नदीमुळे शेतकरी मिरची, तांदुळ, मका, कापूस, ज्वारी, मूग आदी पिके घेतात. असरअली गावात शासकीय यंत्रणेची बहुतांश कार्यालये आहेत. त्यात प्रामुख्याने पोलिस विभाग, महसूल विभाग (मंडळ कार्यालय इमारत), वन विभाग कार्यालय, आरोग्य ीग, विद्युत विभागाचे ३३ केव्ही पॅावर स्टेशन, पाणी पुरवठा यंत्रणा, बँक, शाळा-महाविद्यालय, धान खरेदी केंद्र इत्यादी यंत्रणांची सोयी आणि शासकिय जमीन असल्याने असरअली तालुका म्हणून घोषित करण्यास योग्य आहे. सध्या या क्षेत्रासाठी सिरोंचा हा तालुका आहे. परंतु असरअली भागातील नागरिकांना सिरोंचाला जाण्यासाठी २० ते ६० कि.मी. अंतर पार करावे लागते. कोणत्याही शासकीय कामांसाठी शेतकरी, जेष्ठ नागरिक, शाळेकरी मुलें यांना कामधंदा सोडून पुर्ण दिवस शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. असरअलीला तालुक्याचा दर्जा दिल्ह्यात नागरिकांचा सिरोंचाला जाण्याचा त्रास वाचेल. त्यामुळे यासंदर्भात शासनाने गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी सुगरवार यांच्यासह इतर नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी वेळप्रसंगी नागरिक आंदोलन करण्याच्याही तयारीत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
झिंगानूरलाही हवा तालुक्याचा दर्जा
सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून झिंगानूर या दुर्लक्षित गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा आणि झिंगानूरसह परिसरातील गावांना विकासाच्या प्रवाहात आणावे अशी मागणी या भागातील नागरिकांमधून जोर धरत आहे. झिंगानूर गावाला कोणत्याही प्रकारे नदी किंवा नाल्यांच्या पुराचा त्रास नाही. झिंगानूर परिसरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना कधी घडली नाही. हे ८० टक्के आदिवासी बांधवांचे क्षेत्र आहे. या गावापासून चारही बाजुला लवकर संपर्क होऊ शकतो. झिंगानूर हे गाव उंच भागावर आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभार पाहताना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची अडचण येणार नाही. आदिवासी भागातील आदर्श गाव म्हणून या गावाला ओळखले जाते.
आदिवासी क्षेत्रातील माडिया व गोंड समाजाचे प्राबल्य असलेल्या या झिंगानूर गावाला तालुका घोषित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. परंतू आतापर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष झाले. तालुक्याचा दर्जा मिळाल्यास या भागातील विकासात्मक कामांकडे प्रशासनाचे लक्ष जाईल. त्यामुळे दक्षिण गडचिरोलीचे मुख्यालय असलेल्या अहेरीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा केव्हाही द्या, पण आम्हाला आधी तालुक्याचा दर्जा द्या, अशी या भागातील ३० गावांमधील आदिवासींची मागणी आहे.