गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला एका इसमाने फुस लावुन पळविले होते. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित इसमाचे मोबाईल लोकेशन शोधून तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास करत उत्तर प्रदेशातील मेरठ गाठले. तेथून अल्पवयीन मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले. सायबर शाखेच्या मदतीने अवघ्या 24 तासात पोलिसांनी ही कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, दि.27 मे रोजी धानोरा येथील एका अल्पवयीन मुलीला एका इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दि.28 ला केली होती. धानोरा पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंद करुन पोलिस उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. चौकशीदरम्यान मुलीच्या आई-वडीलांनी एका संशयित इसमाच्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळवून तांत्रिक बाबींच्या आधारे मोबाईलचे शेवटचे लोकेशन शोधले. त्यात आरोपी हा नागपूरवरुन छत्तीसगड एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसून आले. तसेच ती रेल्वे ही नागपूरवरुन मेरठच्या (उत्तर प्रदेश) दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तो आरोपी मुलीला मेरठ येथे घेऊन जात असल्याचा संशय आल्याने पीएसआय स्वरूपा नाईकवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि.28 च्या मध्यरात्री शासकिय वाहनाने सहकाऱ्यांना घेऊन मेरठकरीता रवाना झाल्या. एकूण 1400 कि.मी. अंतर प्रवास करुन मेरठ येथे पोहोचल्यानंतर सायबर शाखेच्या मदतीने आरोपीला व अप्रहत मुलीला मेरठ (उ.प्र.) येथील रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना धानोऱ्याला आणले.
अधिक चौकशीअंती सदर गुन्हयामधील आरोपी अनुज पाल (37 वर्ष), रा.मेरठ (उ.प्र.) याच्या विरुध्द धानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे यांनी केली.