गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विविध प्राधिकरणाचे सदस्य, तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्याच्या बिलाची रक्कम त्यांच्या खात्यात न टाकता स्वत:च्या खात्यात वळती करून तब्बल 1 कोटी 46 लाखांवर डल्ला मारण्याचा चार लिपिकांचा डाव फसला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यातील तीन लिपिकांना अटक करण्यात आली, तर एका महिला लिपिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्रकुमार उसेंडी (37 वर्ष), अमित जांभुळे (38 वर्ष), अमोल रंगारी (36 वर्ष) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून प्रिया पगाडे या महिला लिपिकाचाही आरोपींमध्ये समावेश आहे. अटकेतील तीनही लिपिकांना 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
संबंधित सदस्यांच्या खात्यात रक्कम आली नसल्याने त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे चौकशी केली असता हा अपहार उघडकीस आला. त्यामुळे गडचिरोली पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चारही आरोपींवर भादंवि कलम 420, 409 आणि 120 अन्वये गुन्हा दाखल केला.
हा अपहार करण्यासाठी वरील चारही लिपिकांनी संगनमत करून आपल्या 9 बँक खात्यात ती रक्कम वळती केली. त्यापैकी 6 खाती मुख्य आरोपी असलेल्या महेशकुमार उसेंडी याच्या एकट्याची असल्याचे सांगण्यात येते.