गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी भाजपनच्या वतीने रविवारी दिवसभर गडचिरोलीच्या विश्राम भवनात समीक्षा बैठक घेण्यात आली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय भेंडे आणि धर्मपाल मेश्राम, तसेच भाजपचे आर्थिक प्रकोष्ठ प्रमुख तथा चार्टर्ड अकाउंटंट मिलिंद कानडे यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पराभवामागील कारणे जाणून घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या पराभवामागील प्रमुख कारण म्हणजे विरोधकांनी संविधान बदलविण्याच्या मुद्द्यावर केलेला अपप्रचार हे असल्याचे सांगितले. मात्र या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितले.
या समीक्षा बैठकीला माजी खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, माजी आ.डॅा.प्रा.अतुल देशकर, संजय पुराम, डॅा.नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष अॅड.येशुलाल उपराडे, याशिवाय रमेश भुरसे, रविंद्र ओल्लालवार, सदानंद कुथे, प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, विलास दशमुखे, योगिता पिपरे, गीता हिंगे यांच्यासह गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील विधानसभांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय भेंडे म्हणाले, आमचे पावणेतीनशे खासदार होतेच, त्यात 25 ने वाढ व्हावी हे ध्येय ठेवून 400 पार असा नारा देण्यात आला. पण काँग्रेसने त्याचा संबंध जोडत संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला, तो मुद्दा आम्ही खोडून काढू शकलो नाही, अशी कबुली त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील तोडाफोडीच्या राजकारणाचा मतदारांमध्ये नकारात्मक परिणाम झाल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, संख्याबळ वाढवून माणसं जोडण्याचे काम आम्ही केले, हे पुढेही करत राहणार आहे. त्याचा मतदारांवर परिणाम झाला नसल्याचे ते म्हणाले.
विधानसभेसाठीही घेणार सर्व्हेचा आधार
लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवताना सर्व्हेचा अहवाल आणि इच्छुक उमेदवाराच्या कामाचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे भेंडे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीची आठवण म्हणून 25 जून रोजी आणीबाणी काळा दिवस पाळणार असल्याचे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
भाजप नेहमीच संविधानाचा सन्मान करणार- नेते
बैठकीत माजी खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला सर्वांनी एकमताने प्रतिसाद दिला. यावेळी नेते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी मागील १० वर्षात प्रगतीशिल, विकासशिल भारत घडविण्यासाठी अनेक योजना आणल्या. दीन-दलित, शोषित, वंचितांपर्यंत त्या योजनाही पोहोचवण्यात आल्या. देशाला विकासाची दृष्टी देण्यासोबत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली. परंतू विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत संविधान बदलविणार असल्याचा अपप्रचार केला. त्यात ‘अब की बार, 400 पार’च्या नाऱ्यामुळे मतदारांच्या मनात आणखी शंकेला वाव मिळाला. मात्र गेल्या 10 वर्षात संविधानाच्या आधारेच एनडीए सरकार चालविण्यात आले आणि भाजप नेहमीच संविधानाचा सन्मान करत राहणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मेहनत घेणार्या लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त करत पुढील वाटचालीत जनतेच्या हिताची कामे सुरूच ठेवणार असल्याचे ते सांगितले.