अहेरी : तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड ईस्पात कंपनी आणि मियाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना नोट बुक, पुस्तके, स्कूल बॅग आणि महिला भगिनींना साड्यांचे वाटप करण्यात आले. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, पोलीस पाटील निरंजन दुर्गे, आदिवासी सेवक डॉ.चरणजितसिंह सलुजा, प्रमोद इष्टाम उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे मुख्य स्त्रोत आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी उत्तमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःचे, कुटुंबाचे, गावाचे आणि पर्यायाने राज्याचे उज्ज्वल भविष्य घडवावे आणि नावलौकिक करावा, असे आवाहन केले. योग्य वेळी विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तर साड्यांची भेट मिळाल्याने महिलावर्गात उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील निरंजन दुर्गे यांनी, तर संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थी, महिला भगिनी, वडलापेठ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.