गडचिरोली : येत्या गुरूवार दि.27 पासून मुंबईत सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी हे 35 तारांकित प्रश्न, 17 लक्षवेधी आणि 11 औचित्याचे मुद्दे उपस्थित करणार आहेत. याशिवाय 2 अर्ध्या तासाच्या प्रश्नांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे डॅा.होळी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले जाणार आहे.
या अधिवेशनात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी मागण्यासोबत समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे डॅा.होळी यांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देणे, वादळ वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आर्थिक मदत देणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह महत्वाच्या प्रशासकीय भवनांच्या बांधकामासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासोबत प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, मार्कंडा देवस्थान मंदिराचे काम सुरू करणे, याशिवाय इतर सामाजिक प्रश्नांकडे डॅा.होळी लक्ष वेधणार आहेत.
निधीअभावी रखडले चिचडोह बॅरेजचे काम
चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजच्या उर्वरित कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. तो निधी मिळाल्यास राहिलेली कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळून सिंचनात वाढ होणार आहे. त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आ.डॅा.होळी यांनी सांगितले.
मार्कंडेश्वर मंदिर परिसरात होणार सौंदर्यीकरण
मार्कंडादेव येथील प्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिरापासून 100 मीटरच्या बाहेरील परीघात पुरातत्व विभागाने बांधकामे करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यातून सौंदर्यीकरणासह येणाऱ्या धार्मिक पर्यटकांसाठी, तसेच श्राद्ध कार्यासाठी नदीघाटावर सुविधा निर्माण केल्या जााणार आहेत.
पत्रपरिषदेला भाजपचे पदाधिकारी रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, मुक्तेश्वर काटवे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, यश गण्यारपवार, रामचंद्र वरवाडे आदी उपस्थित होते.