गडचिरोली : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला राजधानी दिल्लीत सुरुवात झाली. यासोबतच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात पार पडला. गडचिरोली-चिमूरचे नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी इंग्रजीत शपथग्रहण केली. इंग्रजीतून शपथ घेणारे ते या मतदार संघातील पहिलेच खासदार ठरले. विशेष म्हणजे संसद भवनात प्रवेश करताना डॅा.किरसान यांनी नम्रपणे संसद भवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन नंतर सभागृहात प्रवेश केला.
प्रोटेम स्पीकर महताब भरतुहारी यांनी लोकसभेतील सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. या अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीमधील वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांची त्यांनी भेट घेतली. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी एकत्रित फोटोही काढला. यावेळी खा.सुप्रिया सुळे, खा.प्रणिती शिंदे, खा.प्रतिभा धानोरकर यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.
यावेळी डॅा.किरसान यांच्यासोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सतीश वारजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, नलिनी किरसान, अॅड.दुष्यन्त किरसान हेदेखील उपस्थित होते.