गडचिरोली : दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारख्या विविध मैदानी स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये आता बुद्धीबळाचीही भर पडली आहे. अधिराज वेलफेअर फाउंडेशन, रोशन सर चेस अॅकॅडमी, अप्पलवार आय हॉस्पिटल आणि गडचिरोली जिल्हा अॅमॅच्युअर चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार, दि.30 जून रोजी ‘अधिराज बुद्धीबळ चषक’ या एक दिवसीय जलद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. पोलीस मुख्यालय परिसरातील पांडू आलाम सभागृहामध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांमधून 460 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात घेण्यात आली. त्यात खुला वर्ग, 15 वर्षाच्या आतील, 10 वर्षाआतील आणि 8 वर्षाआतील अशा चार गटांचा समावेश होता. प्रत्येक गटातील स्पर्धकांचे 08 राऊंड घेण्यात आले. त्यामध्ये खुल्या गटात प्रथम क्रमांक दिशांक सचिन बजाज, द्वितीय- आदित्य नरेंद्र ऊईके व तृतीय- शौनक बडोले यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 15,000 रुपये, 10,000 रुपये व 7000 रु.रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
15 वर्षाआतील वयोगटात प्रथम- सहजविरसिंग मारस, द्वितीय- सार्थक मंगेश वासेकर तर तृतीय क्रमांक निहान पोहाने याने पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 10000, 7000 व 5000 रु. रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, 10 वर्षाआतील गटामध्ये प्रथम- वेद निरज पौर, द्वितीय- परिस कुबडे व तृतीय क्रमांक- रुद्र ठवकर याने पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000 व 3000 रु.रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र, तसेच 8 वर्षाआतील गटामध्ये प्रथम- कनिष्क उमेश इंदूरकर, द्वितीय- वेदांत नितीन पुजारा आणि तृतीय क्रमांक युग बोंडे याने पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000 व 1000 रु.रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच बेस्ट सिनियर प्लेअर प्रथम- प्रमोद धामगये व द्वितीय- ईश्वर रामटेके, बेस्ट यंगेस्ट बॉय – श्राव्यश्लोक, बेस्ट यंगेस्ट गर्ल – ताश्वी धिरज जारोंडे व बेस्ट फिमेल प्लेअर प्रथम- हर्षिता कुचेरिया व द्वितीय-अरूणा धुंदले यांनी पटकाविला. या बुद्धीबळ स्पर्धेत एकुण 61 बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
आणखी मोठ्या स्तरावर स्पर्धा घेणार- नीलोत्पल
स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच बु्द्धीबळ स्पर्धेत एवढ्या संख्येने खेडाळू सहभागी झाले आहेत. येथुन पुढे ही स्पर्धा मोठ्या स्तरावर आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. स्पर्धकांच्या पालकांनी व स्पर्धकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेडाळू व पालकांची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून अप्पलवार आय हॉस्पीटलने हातभार लावून मोलाचा वाटा उचलला.