गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील मौजा कोयनगुडा या लहानशा आदिवासी गावाने शालेय सत्रारंभाचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला. पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या पहिलीतील विद्यार्थ्यांची बैलबंडीत बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील शिक्षकांच्या प्रयत्नाने ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. त्याचा प्रत्यय सत्राच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी दिला.
या मिरवणुकीसाठी विद्यार्थ्यांची बैलगाडी सजवण्यात आली होती. बँडच्या तालावार आणि लाऊडस्पीकर लावून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके, शूज व सॉक्स, तसेच सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून स्कूल बॅग देण्यात आल्या. दुपारच्या मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण देण्यात आले. तसेच दुपारनंतर विद्यार्थ्यांनी विविध मजेशिर खेळ खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी केंद्रप्रमुख सुरेश बांबोळे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुदेव हबका तसेच संपूर्ण शाळा समितीच्या सदस्यांनी, गावकरी महिला पालक, मुख्याध्यापक विनीत पद्मावार व शिक्षक वसंत इष्टम यांनी विशेष सहकार्य करत हा दिवस अविस्मरणीय केला.