गडचिरोली : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली, मात्र अजूनही ती लागू करण्यात आलेली नाही. कर्मचारी आपले अधिकाधिक आयुष्य शासकीय सेवेत देतात. मात्र निवृत्त झाल्यानंतर पेन्शन न मिळाल्यास त्यांना व त्यांच्या परिवाराला मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आवश्यक असल्याचे सांगत राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या व 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करून न्याय द्यावा, अशी मागणी आ.डॉ. देवराव होळी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.
डॅा.होळी यांनी सभागृहात जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडली. राज्य सरकारने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. विविध योजनांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. मात्र आणखी काही महत्वाच्या समस्या मार्गी लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. विकासापासून दूर असलेल्या जिल्ह्यासाठी डेव्हलपमेंट इंडेक्स तयार करण्याची आणि या क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल झोन निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली. गडचिरोली येथे दोन नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.
मेडिकल कॉलेजमध्ये यावर्षीपासूनच 100 विद्यार्थ्यांची बॅच सुरू करावी अशी मागणी डॅा.होळी यांनी केली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर ते गडचिरोली करण्यासंदर्भात केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी केली. जिल्ह्यातील सिंचन योजना, आदिवासी विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती याकडे त्यांनी लक्ष वेधले.