एसटी प्रवासी आणि कामगारांच्या तक्रारींचे आगार पातळीवर होणार निराकरण

आगारांमध्ये 19 पासून प्रवासी राजा दिन

गडचिरोली : एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना एसटीच्या सेवेसंदर्भात किंवा एसटी कामगारांना कोणत्या तक्रारी असतील तर त्यांचे निराकरण करण्यासाठी आगार पातळीवर विशेष दिन पाळला जाणार आहे. यात गडचिरोली विभागाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे स्वत: उपस्थित राहून तक्रारी ऐकणार आहेत.

प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आगारात हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात शुक्रवार दि.19 जुलै रोजी गडचिरोली आगार, 26 जुलै रोजी ब्रह्मपुरी आगार, 2 आॅगस्ट रोजी अहेरी आगार तर शुक्रवार 9 आॅगस्ट रोजी पुन्हा गडचिरोली आगारात आगार व्यवस्थापकांच्या दालनात तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहेत. यात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ प्रवाशांसाठी, तर दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत कामगारांसाठी वेळ राखीव राहणार आहे. या उपक्रमाचा सर्व प्रवाशी आणि कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.