रस्त्यात गाठून महिलेवर अत्याचार करणारा अनोळखी इसम अखेर जेरबंद

कुठलेही धागेदोरे नसताना एलसीबीच्या पथकाने घेतला शोध

अत्याचार करून गायब झालेला हाच तो आरोपी, सोबत कारवाई करणारे पोलीस पथक

गडचिरोली : दिवसभर आपले काम आटोपून ती महिला निर्जन रस्त्याने एकटी घराच्या ओढीने निघाली होती. संध्याकाळचे पाच वाजलेले. अशात त्याची नजर तिच्यावर पडली. तिच्या असहायतेचा फायदा घेत त्याने अमानुषपणे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पाशवी बळापुढे तिचा विरोधही थिटा पडला. अचानक समोर येऊन कुकृत्य करणारा तो कोण, कुठला, त्याचे नाव-गाव काहीच माहित नव्हते. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत पोलिसांनी त्याला हुडकून काढले आणि चंद्रपूर येथून अटक केली.

असहाय महिलेवरील अत्याचाराची ही घटना गेल्या २७ मे रोजी चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठून आपबिती तर सांगितली, पण त्या घटनेने ती चांगलीच हादरून गेली होती. गडचिरोलीतील महिला रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. वैद्यकीय अहवाल आणि रिपोर्टवरून त्या अज्ञात इसमावर गुन्हाही दाखल झाला, मात्र त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे होते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखून त्या आरोपीला शोधून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चामोर्शी ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिळून ४ पथके तयार केली. एलसीबीच्या सहायक पो.निरीक्षक रुपाली पाटील यांनी पीडित महिलेची रुग्णालयात भेट घेऊन आरोपीचे वर्णन जाणून घेतले. पण मानसिक आघातामुळे ती संपूर्ण माहितीही देऊ शकत नव्हती. त्यामुळे वन स्टॅाप सेंटरमधील समुपदेशकाच्या मदतीने पीडित महिलेला बोलते केले. त्यावरून आरोपीचे रेखाचित्र काढण्यात आले. घटनास्थळाच्या परिसरात चौकशी केली असताना घटनेच्या तारखेपासून मिथुन मडावी हा इसम गावात नसल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याचे नातेवाईक असणाऱ्या परिसरात गोपनिय बातमीदारांचे जाळे पसरविण्यात आले. त्याचा भाऊ चंद्रपूर येथे राहात असल्याचे समजल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. अखेर ७ जूनला त्याला चंद्रपूर एलसीबीच्या मदतीने आरोपी मिथुन मडावी याला ताब्यात घेण्यात आले. गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांच्याकडे देण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या नेतृत्वात सपोनि रूपाली पाटील, उपनिरीक्षक राहुल पाटील, दीपक कुंभारे, पल्लवी वाघ, सुधीर साठे, तसेच पुरूषोत्तम वाटगुरे, नायक दीपक लेनगुरे, शिपाई श्रीकांत बोईना, सचिन घुबडे, अकबर पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, चालक शगिर शेख, मनोहर टोगरवार, माणिक निसार यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन केली.