अहेरी : पावसासोबत आता डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरातील प्रमुख रस्त्यांवर फॅाग मशिन फिरवण्यात आली. पण लक्ष्मीपूर वॅार्ड, धर्मपूर वॅार्ड अशा अंतर्गत भागातील गल्ल्यांमध्ये फॅाग मशिनचा धूर दिसलाच नाही. या गल्लीबोळींमध्ये निर्जंतुकीकरण करणार आहे की नाही, की मशिन फिरवल्याचे कागदोपत्री दाखवून नुसती बिलंच काढली जाणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला नगरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने फॅाग मशिन फिरवल्या जात असल्याचे पाहून नागरिकांनी या तत्परतेचे कौतुक केले. पण ही धूरफवारणी करताना धरसोडपणा करण्यात आला. त्यामुळे आपल्या भागात ही धूरफवारणी कधी होणार, अशी प्रतीक्षा अनेक भागातील नागरिक करत आहेत. धूरफवारणीतील या धरसोडपणामुळे फवारणीमागील उद्देश साध्य होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
फवारणी केली जात असताना संबंधित कर्मचाऱ्याला स्वरक्षणासाठी आवश्यक असलेला मास्क, गणवेशसुद्धा दिलेला नव्हता. त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात येऊ शकते. डासजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी अहेरीतील ज्या भागात अद्याप धूरफवारणी केलेली नाही त्या भागात फवारणी करून संपूर्ण नगरात निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.