गडचिरोली : जिल्ह्यातील वाढती हिवताप रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाकडून सर्व विभागांच्या समन्वयाने विविध उपाययोजना युद्धपातळीवर केल्या जात आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत डासजन्य अशा 257 गावांमध्ये कीटकनाशकाची फवारणी पूर्ण झाली असून उर्रवित 401 गावांत फवारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या 16 ऑगस्टपासून पुन्हा त्याच 658 गावांमध्ये दुसऱ्या फेरीतील कीटकनाशक फवारणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले.
जिल्ह्यात हिवतापाची रक्त तपासणी लवकरात लवकर होण्यासाठी नागपूर मंडळातून इतर जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. तसेच 140 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी हिवताप सर्वेक्षण केले जात आहे. तसेच हिवताप उपचार, मच्छरदानी वापराविषयी परिसर स्वच्छतेविषयी आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती केली जात आहे.
मुख्य कार्यकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून ‘टार्गेट मलेरिया 2024’ ही विशेष मोहीम जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 1 एप्रिल 2024 पासून राबवली जात आहे. यामध्ये 6 तालुक्यातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्रातील अतिसंवेदनशील 722 गावे निवडण्यात आली आहेत. या गावांतील 2 लाख 72 हजार 66 लोकसंख्येला आशा व आरोग्य कर्माचारी प्रत्यक्ष भेट देऊन व रक्तनमुने घेऊन निदान व औषधोपचार करत आहेत.
टार्गेट मलेरिया 2024 अंतर्गत 16 प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रथम फेरीमध्ये (दि 1 एप्रिल ते 31 मे) 2 लाख 72 हजार 66 लोकसंख्येपैकी 2 लाख 62 हजार 598 लोकसंख्येची तपासणी पूर्ण झाली असून यामध्ये 2 लाख 81 हजार 223 इतक्या हिवताप चाचण्या करण्यात आल्या आहेत. याशिाय दुसऱ्या फेरीत (दि 1 जून ते दि 11 जुलैपर्यंत) 1 लाख 53 हजार 902 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये विविध प्रकारचे एकूण 424 बाधित रुग्ण आढळून आले. हिवताप दूषित रुग्णांवर आरोग्य कर्मच्याऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार चालू आहेत. उपचार पूर्ण होईपर्यत पाठपुरावा देखील केला जात असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके यांनी कळवले आहे.