गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता 31 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शेकडो गावे तालुका आणि जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काबाहेर गेली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारची सुटी जाहीर केली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारे कोटगल बॅरेज येथील 70 नागरिकांना आणि पारडी येथील 19 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी त्यांची भेट घेत आवश्यक सूचना केल्या. जिल्ह्याच्या इतरही भागात आश्रयगृहाची व्यवस्था केली असून आवश्यकतेनुसार त्यात नागरिकांनी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट उघडलेले असून त्यातून 3.21 लक्ष क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. ते पाणी गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत येऊन वैनगंगेसह इतर उपनद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे आष्टीजवळच्या पुलावर पाणी चढून आष्टी-गोंडपिंपरी हा मार्गही बंद झाला आहे. गडचिरोलीवरून नागपूर आणि चंद्रपूर जाणेही कठीण झाले आहे. गडचिरोली ते आरमोरी आणि गडचिरोली ते चामोर्शी हे मार्ग सोमवारी सकाळी वाहतुकीसाठी सुरू झाले असले तरी गोसेखुर्दच्या विसर्गामुळे ते कधीही बंद होऊ शकतात, असे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनी सांगितले. नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूरपरिस्थितीत बचाव कार्यासाठी सिरोंचा, भामरागड व गडचिरोली या तालुक्यांच्या ठिकाणी एसडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा 3 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.
पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना, तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढून स्थलांतरीत करण्यात येत आहे. आश्रयगृहात नागरिकांकरिता राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संसाधन सुसज्जता, रेशन व औषधीची उपलब्धता, विशेषतः गर्भवती मातांची काळजी इत्यादी संदर्भाने दक्षता घेण्याबाबत यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहे. मागील 72 तासात पावसामुळे झालेल्या घरांचे नुकसान तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले आहेत.
गडचिरोली शहरात काल सखल भागात जमलेल्या पाण्याचा निचरा झालेला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भामरागड तालुका मुख्यालयी पर्लकोटाचे पाणी सध्या ओसरणे सुरु आहे. नागरिकांनी पूर परिस्थितीत विनाकारण घराबाहेर पडू नये, पुलावरून पाणी वाहत असताना पुढे जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केले आहे.
वाढविण्यात येत असलेला विसर्ग व कॅचमेन्टमधील पाऊस लक्षात घेता बऱ्यापैकी मार्ग बंदच राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अतितातडीच्या कारणाशिवाय व मार्गांची माहिती घेतल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.