गडचिरोली : पंजाबमधील अमृतसर येथे 7 आॅगस्टला होत असलेल्या 9 व्या ओबीसी महाअधिवेशनासाठी गडचिरोली जिल्ह्यातून 300 वर ओबीसी बांधव रवाना झाले आहेत. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज येथून सोमवारी हे समाजबांधव अमृतसरसाठी रवाना झाले. या अधिवेशनात समाजाच्या विविध प्रश्नांवर मंथन होणार आहे.
अमृतसरच्या गुरूनानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बुधवारी सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, आरक्षणासाठी 50 टक्क्यांची अट रद्द करणे यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होणार आहे. समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाब विधानसभेचे उपसभापती जय क्रिष्ण सिंग, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्रातील ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, क्रिकेटपटू तथा राज्यसभा सदस्य हरभजन सिंग, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्यासह इतर खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचे ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर यांनी कळविले.