धर्मराव महाविद्यालयाचे प्राचार्य भोंगळे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्निक सत्कार

जुन्या आठवणींना उजाळा देत निरोप

अहेरी : येथील धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल भोंगळे 31 आॅगष्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विनोद भोसले, तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद दोंतुलवार, सत्कारमूर्ती म्हणून प्राचार्य अनिल भोंगळे व त्यांच्या अर्धांगिनी वैशाली भोंगळे हे दाम्पत्य होते.

यावेळी भोंगळे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ, साडीचोळी व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच विनोद भोसले, प्रमोद दोंतुलवार, जयश्री खोंडे, वंदना जाधव यांनी प्राचार्य भोंगळे यांच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत उल्लेखनीय सेवा दिल्याचा उल्लेख करून जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रंथपाल हेमंत बोरकर यांनी भावगीत सादर केले.

सत्काराला उत्तर देताना प्राचार्य अनिल भोंगळे यांनी धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजे अंब्रिशराव महाराज यांचे व संस्थेतील अन्य पदाधिकाऱ्यांचे आभार मानून संस्थेतील व शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने योग्य सहकार्य केल्याने सेवा व्यवस्थित बजाविता आली अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांनी भावनिक क्षण आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे संचालन दिनेश ठिकरे यांनी तर आभार मंगला भागवत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.घनश्याम बारसे, प्रा.विजय उरकुडे, आतिष दोंतुलवार, मुकेश गोंगले, कमलाकर ठेंगरी, जनार्दन झाडे, मनीषा गुळधाणे, सुनीता ताजने, कीर्ती विश्वनादुलवार यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.