गडचिरोली : मागील 15 दिवसांपासून आलेल्या सततच्या पावसामुळे व पूरपरिस्थितीमुळे वडसा-गडचिरोली रेल्वेलाईनचे बांधकाम खोळंबले होते. आता पाऊस, पूर ओसरल्याने या कामाची गती वाढविण्यासाठी मंगळवारी (दि.6) माजी खासदार आणि या प्रकल्पाचे शिल्पकार माजी खासदार अशोक नेते यांनी अडपल्ली-गोगांव या ठिकाणच्या रेल्वे लाईनच्या कामाची पाहणी केली. यावेळी संबंधित अभियंत्यांनी या कामातील काही अडचणीही मांडल्या. त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अडचणी दूर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही यावेळी नेते यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे माजी खासदार तथा भाजपच्या अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या पाठपुराव्यानंतर वडसा-गडचिरोली या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली होती. हा प्रकल्प आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्यामुळे या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी भूमिका नेते यांनी स्पष्ट केली. त्यामुळेच त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सदर कामात असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच हे काम पूर्णत्वास जात असल्याचे पाहून आनंद व समाधान व्यक्त केले.
यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता आर.पी.सिंग, व्यवस्थापक अरुण जैन, चंद्रकांत सराटे, भाजपचे नेते दत्तुजी माकोडे उपस्थित होते.