अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी (एपी) विरूद्ध राष्ट्रवादी (एसपी) असा सामना रंगणार?

एकीकडे धर्मरावबाबा, दुसरीकडे अनेक चेहरे

गडचिरोली : सर्व राजकीय पक्षांना आता अवघ्या दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांपैकी सर्वात चर्चेत राहणारा मतदार संघ म्हणून अहेरीचे नाव घेतले जाते. महायुतीमधील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर या मतदार संघावर महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम राहणार आहे. त्यामुळे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेले ना.धर्मरावबाबा आत्राम हे येथे सशक्त उमेदवार म्हणून रिंगणात राहतील. मात्र त्यांचा सामना करण्यासाठी संधीची प्रतीक्षा करत असलेले अनेक चेहरे समोर येत असल्यामुळे नेमके कोण कोणाकडून रिंगणात उतरणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत आतापर्यंत हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात होता. त्यामुळे काँग्रेसला या भागात जास्त हातपाय पसरता आले नाही. धर्मरावबाबा महायुतीत सहभागी झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून अहेरी मतदार संघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (श.प.) आपला दावा न सोडता भाजपच्या गोटातील युवा चेहऱ्याला आपल्याकडे ओढत तिकीट देण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार हे निश्चित झाल्यापासून संदीप कोरेत हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. वैयक्तिक आणि महाविकास आघाडीच्या मतांचे गणित जुळवून कोरेत हे भक्कमपणे लढत देतील असा विश्वासही राष्ट्रवादीच्या (श.प.) गोटातून व्यक्त केला जात आहे.

असे असले तरी ही जागा काँग्रेसच्या कोट्यात यावी यासाठीच्या हालचाली थांबलेल्या नाहीत. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे त्यासाठी प्रयत्न करतील आणि ही जागा काँग्रेसकडे येईल, अशी आशा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी करत असलेल्या हनमंतू मडावी या सेवानिवृत्त वनअधिकाऱ्यांसह सर्वांना वाटते. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आपली तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तिकडे काँग्रेसचा जुना मतदारवर्ग माजी आमदार पेंटारामा तलांडी यांना मानणारा आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यास रिंगणात उतरण्यासाठी त्यांचीही तयारी आहे.

तिकडे तेलंगणातील के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या तंबूत गेलेले माजी आमदार दीपक आत्राम अनेक दिवसांपासून शांत आहेत. मात्र त्यांचाही चाहता वर्ग या मतदार संघात आहे. 2019 च्या निवडणुकीत तिहेरी लढतीत त्यांनी 43 हजार मते घेऊन आपली ताकद दाखवली होती. यावेळी ते प्रथमच भारत राष्ट्र समितीचा झेंडा घेऊन नव्या जोमाने रिंगणात उतरतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

– तर नाविसं होणार सक्रिय?

2014 च्या निवडणुकीत भाजपमध्ये सक्रिय होऊन पहिल्यांदा अहेरी विधानसभेची निवडणूक जिंकणारे आणि राज्यमंत्रीपदही मिळालेले अम्ब्रिशराव आत्राम यांची सध्या सर्वात मोठी अडचण झाली आहे. महायुतीचा घटक म्हणून अहेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने या मतदार संघावरचा भाजपचा दावा संपुष्टात आला आहे. अशात निवडणुकीच्या रिंगणात उतरायचेच असेल तर पर्याय म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) कडून किंवा वडील सत्यवानराव महाराज यांच्या नाग विदर्भ संघर्ष समितीला पुनरूज्जिवित करून त्या झेंड्याखाली आपल्या कार्यकर्त्यांना गोळा करावे लागणार आहे. अलीकडे भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अम्ब्रिशराव यांची अनुपस्थिती पाहता ते या पर्यायांवर विचार करू शकतात, अशी चर्चा आहे.

एकूण परिस्थिती पाहता धर्मरावबाबा आत्राम यांच्याशिवाय इतर कोणताही उमेदवाराची दावेदारी सध्यातरी निश्चित नाही. मात्र महिनाभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होऊन उमेदवारीवरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळू शकेल.