गडचिरोली : घरात एकट्या राहणाऱ्या सेवानिवृत्त परिचारिकेचे हातपाय खुर्चीला बांधून ठेवून जबरीने साडेतीन लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना गेल्या 29 जुलै रोजी आरमोरीजवळच्या ठाणेगाव (नवीन) येथे भरदिवसा घडली होती. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलासह तीन नवतरुणांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह आरमोरी पोलिसांनी ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरीपासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणेगाव (नवीन) येथे एकट्याच राहात असलेल्या सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात 29 जुलैच्या सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास काही युवक शिरले. त्यांनी सदर वृद्ध परिचारिकेला आरडाओरड करण्याची संधी न देता तोंडावर कापड बांधून खुर्चीवर बसवले आणि हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर आरामात घरातील कपाटात ठेवलेले, ड्रेसिंग टेबलमध्ये असलेले आणि अंगावर असलेले सर्व मौल्यवान दागिने, एवढेच नाही तर हातातील घड्याळही काढून घेत तेथून पळ काढला. दुपारी 12.30 पर्यंत, म्हणजे जवळपास पावणेदोन तासात या चोरट्यांनी 3 लाख, 49 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला.
या घटनेच्या तोंडी रिपोर्टवरुन आरमोरी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 309(4), 306(क), 3(5) अन्वये अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा नोंद केला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. तंत्रशुध्द पध्दतीने आरोपींचा माग काढत पथकाने त्यांचा शोध लावला. त्यात अंकित भीमराव लटारे (24 वर्ष, रा.ठाणेगाव), प्रशांत विलास राऊत (22 वर्ष, रा.रामाळा) आणि प्रतिक राजू भुरसे (23 वर्ष, रा.ठाणेगाव) यांचा समावेश आहे. याशिवाय या गुन्ह्यात सहभागी असलेल्या ठाणेगावातील एका 17 वर्ष 6 महिने वयाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. तीनही आरोपींना न्यायालयाने 12 आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
भिलाईमध्ये लपवून ठेवला होता चोरलेला ऐवज
आरोपी अंकित लटारे हा सदर गुन्हयाचा प्रमुख सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील मुद्देमाल छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे लपवून ठेवला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस पथकाने तिथे जाऊन तो मुद्देमाल हस्तगत केला. या आरोपी युवकांचा यापुर्वी अशाच प्रकारच्या आणखी कोणत्या गुन्हयात सहभाग होता का, याबाबत पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास आरमोरीचे उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी, आरमोरीचे पोनि.विनोद रहागंडाले, स्थानिक गुन्हे शाखेचे व आरमोरी ठाण्याचे अधिकारी तथा अंमलदारांनी केली.
(आदिवासी दिनाच्या शुभेच्छा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)