एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त हेडरी येथे भव्य रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो महिलांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांना राख्या बांधून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. अतिदुर्गम व आदिवासीबहुल परिसरातील भगिनींनी राख्या बांधून मला दिलेला हा आशीर्वाद मोलाचा आहे, अशी भावना यावेळी ना.धर्मरावबाबा यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धनबाबा आत्राम, माजी जि.प. सदस्य संजय चरडुके, माजी जि.प. सदस्य रामजी कत्तीवार, पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, चंदू दोरपेटी, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, मांतय्या आत्राम, संभाजी हिचामी, पापा पुण्यमुर्तीवार, कवडो पाटील, लक्ष्मण नरोटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्दन नल्लावार, पांडू कोलामी, सुगंधा उराडे, कैलास कोरेत, बाळू राजकोंडावार, नगरसेवक रमेश टिकले, तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, रक्षाबंधनाच्या निमित्ताने हेडरीसारख्या दुर्गम भागात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला याचा आनंद आहे. त्यांचे आशीर्वाद मी जन्मोजन्मी विसरणार नाही. एवढेच नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींच्या उज्वल भविष्यासाठी दिवसरात्र एक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना दिली साडीचोळीची भेट
हेडरी या गावात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आगमन होताच पारंपरिक आदिवासी नृत्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात रक्षाबंधनानंतर मंत्र्यांच्या हस्ते लाडक्या भगिनींना साडीचोळी व भेटवस्तू स्वरूपात ओवाळणी देण्यात आली. आलेल्या लाडक्या बहिणींसाठी कार्यकर्त्यांकडून जेवणाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे संचालन कैलास कोरेत यांनी केले.
पारंपरिक रेला नृत्यात मंत्र्यांनी धरला ठेका
हेडरी गावात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमासाठी ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे आगमन होताच परिसरातील आदिवासी बंधू-भगिनींनी त्यांच्या स्वागतासाठी रेला नृत्त्यासह इतर नृत्य सादर केले. यावेळी धर्मरावबाबा यांनी देखील रेला नृत्यामध्ये ठेका धरला आणि उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.