नमोशुद्रो, पोंड, क्षत्रिय, राजवंशीय बंगाली समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या

अशोक नेते यांची केंद्रीय समितीकडे मागणी

गडचिरोली : महाराष्ट्रातील बंगाली समाजातील नमोशुद्रो, राजवंशीय, क्षत्रिय, पौंड या उपजातींना इतर राज्यात अनुसूचित जाती (SC)चे आरक्षण मिळते. भारतीय संविधानिक अनुसूचित जातीच्या केंद्रीय यादीत या बंगाली उपजाती समाविष्ट आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभेच्या एससी-एसटी कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष फग्गनसिंग कुलस्ते यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर येथे मा.खा.कुलस्ते आले असता अशोक नेते यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली. दिल्लीस्तरावर आपण बंगाली समाजातील या उपजातींना न्याय देण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन यावेळी फग्गनसिंग कुलस्ते यांनी दिले. त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मा.खा.अशोक नेते, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता (मुलचेरा), जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास (भामरागड) आदींचा समावेश होता.