देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात हृदयरोग, कॅन्सर, पोटाचे विकार, मधुमेह यासारख्या अनेक दुर्धर आजारांच्या 325 रुग्णांची तज्ज्ञ डॅाक्टरांनी तपासणी करून उपचारही केले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आणि संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संयोजक आसाराम निरंकारी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक हरिषकुमार निरंकारी, माधवदास निरंकारी आणि तज्ज्ञ डॅाक्टर प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनपर मार्गदर्शनात आ.गजबे यांनी मानवसेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवाकार्य हीच निरंकारी मिशनची ओळख असल्याचे नमूद करून मिशनच्या रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन अशा सेवाकार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
या शिबिरात डॉ.पुरुषोत्तमजी आरोरा (M.D.हृदयरोग तज्ज्ञ, हुबळी, कर्नाटक), डॉ.मनीष मोतीलाल जेठानी (M.S. सर्जिकल ऑन्कोलॅाजी, कॅन्सर, मुंबई), डॉ.कंचन सच्चानम्दानी (M.S सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, मुंबई), डॉ.अंकिता केणी (मुंबई), डॉ.कु.प्रिया मोतीलाल जेठानी (पुणे), डॉ.कोसे, डॉ.गोरव सहारे, डॉ.सोहेल खान तसेच ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य तपासणी कर्मचारी करिश्मा हर्षे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वरी दुधवडे, परिचारिका इत्यादींनी सक्रिय सहभाग घेवून रोगनिदान शिबिरात आलेल्या 325 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी योगदान दिले.
या शिबिरासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. औषधीचे मोफत वितरण करण्यात आले. सर्वांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवादलाच्या सर्व महिला-पुरुष सदस्यांनी गणवेषात सेवा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिष निरंकारी यांनी, तर संचालन नानक कुकरेजा व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना निरंकारी मिशनकडून प्रकाशित काही पुस्तके भेट देण्यात आली.