अहेरीत पद्मशाली समाजाच्या सभामंडपाचे ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण

'माझ्यासाठी प्रत्येक समाजघटक महत्वाचा'

अहेरी : समाजाच्या जडणघडणीत प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. या मार्गावर समाजातील विविधांगी घटकांमध्ये भेदाभेद करून चालणार नाही. सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रत्येक समाजाला सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

अहेरी येथील पद्मशाली समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली समाजाचे माजी अध्यक्ष मारोतराव पडालवार, सुरेश पसपुनुरवार, सुरेश अनमुलवार, अहेरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष राजू पडालवार, उपाध्यक्ष श्रावण दुडमवार, सचिव ओंकार भिमनपल्लीवार, कोषाध्यक्ष शिवकुमार भोगावार, महिला अध्यक्ष योगिता सामलवार, उपाध्यक्ष सरोजिनी गुंडावार, कोषाध्यक्ष रमा भोगावार, सचिव सविता पडालवार, आलापल्ली पद्मशाली समाजाचे अध्यक्ष बापूजी बत्तुलवार, उपाध्यक्ष मधुकर कोंगावार, सचिव जितेंद्र ओडपल्लीवार, देवलमरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष संतोष परसावार, उपाध्यक्ष गणेश दासरवार, सचिव गणेश कोपुलवार, इंदाराम पद्मशाली समाजाचे अध्यक्ष मल्लेश सामलवार, तसेच पद्मशाली समाजाचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी ना.आत्राम म्हणाले, मागील एका वर्षात विविध समाज बांधवांनी समाज मंदीर,संरक्षण भिंत, सभा मंडप आदी कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्या सर्व समाजबांधवांना पाहिजे ती निधी उपलब्ध करून देण्याचे काम माझ्याकडून करण्यात आले. जवळजवळ सर्वच बांधकाम पूर्णत्वास आले आहे. माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणालाही मी नाराज केले नाही. यापुढे देखील कोणाला नाराज करणार नाही. तुमच्या आशीर्वादानेच मी मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहे. यापुढे देखील विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अहेरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष राजू पडालवार यांनी प्रास्ताविकातून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याबद्दल बोलताना ‘दिलेला शब्द पाळणार नेता’ असल्याचा उल्लेख करत त्यांनी एकाच शब्दावर निधी उपलब्ध करून दिला आणि लोकार्पण देखील त्यांनीच केले. त्यामुळे पद्मशाली समाजाला एक सुसज्ज भवन मिळाल्याचे सांगितले. यासाठी समस्त पद्मशाली समाजातर्फे त्यांनी धर्मरावबाबा यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन राजेश सामलवार यांनी केले.

पद्मशाली समाजातर्फे जल्लोषात स्वागत

अहेरीतील टेकडी हनुमानाजवळ असलेल्या मार्कंडेय मंदिर परिसरात विशेष अनुदान योजनेतून पद्मशाली समाजाच्या या सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. लोकार्पण कार्यक्रमासाठी ना.आत्राम यांचे आगमन होताच पद्मशाली समाजातील भगिनींनी औक्षण करून, तर समाजबांधवांनी भलामोठा हार गळ्यात टाकत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. धर्मरावबाबा यांनी मार्कंडेय मंदिरात दर्शन घेऊन सभा मंडप आणि परिसराची पाहणी केली.